शेंदूर्णी दूरक्षेत्राच्या लाचखोर पोलिसासह पंटर एसीबीच्या जाळ्यात


वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी मागितली होती दोन हजार शंभर रुपयांची लाच

जळगाव : तक्रारदारासह कुटुंबियांच्या विरोधात निघालेल्या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी दोन हजार शंभर रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शेंदूर्णी दूरक्षेत्रातील पोलिस नाईक गजानन काशिनाथ पवार (रा.प्लॉट नं.47, सप्तश्रृंगी गगर, निर्मल रेसीडेंसी हॉटेलच्यामागे, भडगाव रोड, पाचोरा) तसेच खाजगी पंटर कडुबा लक्ष्मण पाटील (52, रा.गोंधळपुरा, शेंदुर्णी, ता.जामनेर,जि.जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केल्याने जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. 13 रोजी आरोपींनी लाच मागितल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर 16 रोजी आरोपींना शेंदुर्णीसह जळगावातून अटक करण्यात आली.

लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने अटक व गुन्हा
जामनेर तालुक्यातील 29 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध निघालेल्या वॉरंटमध्ये तक्रारदार व कुटुंबियांना अटक न करण्यासाठी पहुर पोलिस ठाण्यात अंतर्गत येणार्‍या शेंदूर्णी दूरक्षेत्रातील पोलिस नाईक गजानन काशीनाथ पवार यांनी 13 ऑक्टोबर रोजी पंटर कडूबा लक्ष्मण पाटील (शेंदूर्णी) यांच्याद्वारा चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती व तडजोडीअंती ही रक्कम दोन हजार शंभर रुपये ठरवण्यात आली. पंचांसमक्ष आरोपींनी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर बुधवारी सुरुवातीला पंटर व नंतर दुपारी जळगावातून पोलिस नाईक पवार यांना अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी व पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव तसेच नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !