जळगावातील शिवाजी नगर, हुडको भागात तुफान दगडफेक ; दोघे जखमी
जळगाव : शिवाजी नगर हुडको भागामध्ये दोन गटामध्ये कीरकोळ कारणावरून शाब्दिक वाद वाढून गुरुवारी रात्री 11 ते 11:15 वाजेच्या सुमारास हाणामारी होवून दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी लागलीच धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. या प्रकारात दोन्ही गटातील प्रत्येक एक जण जखमी झाला असून परस्परविरोधी गुन्हे शहर पोलिसात दाखल करण्यात आले आहेत.
लहान मुलांच्या कारणावरून वाढला वाद
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे स्वरूप हाणामारी व दगडफेकीत झाले. या प्रकारात दोन जण जखमी झाल्याचे समजते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा आदींनी धाव घेतली. दरम्यान, दोन्ही गटाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.







