रावेरात फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून धडक कारवाई


जंक्शनवर पुन्हा अनधिकृत वेंडर्सचा बोलबाला : रेल्वेच्या कारवाईत 13 अवैध विक्रेत्यांविरुद्ध दंड : 15 ट्रॉली जप्त : दोन लाख तीन हजार 505 रुपयांचा दंड वसुल

भुसावळ : फुकट्या प्रवाशांसह जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध रेल्वेने उघडलेल्या मोहिमेंतर्गत बुधवारी रेल्वे प्रशासनाने रावेर रेल्वे स्थानकावर मोहिम राबत एकूण 410 प्रवाशांकडून तब्बल दोन लाख तीन हजार 505 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईने फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, जंक्शन रेल्वे स्थानकावर अनधिकृत वेंडरांनी पुन्हा डोके वर काढले असून बुधवारी तब्बल 13 अवैध विक्रेत्यांविरूद्ध कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले तसेच 15 ट्रॉली जप्त करण्यात आल्या.

रावेरात तपासणी मोहिमेने खळबळ
रावेर रेल्वे स्थानकावर वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई मोहिम राबवण्यात आली. 37 तिकीट निरीक्षक तसेच 13 रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांची मदत घेत 410 प्रवाशांकडून दोन लाख तीन हजार 505 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणार्‍या 154 प्रवाशांकडून 83 हजार 475 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तसेच जनरल तिकीटावर स्लीपर डब्यात बसून प्रवास करणार्‍या 251 प्रवाशांकडून एक लाख 18 हजार 550 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तसेच सामानाची बुकींगविना वाहतूक केल्याप्रकरणी पाच केसेसच्या माध्यमातून एक हजार 480 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

यांचा कारवाईत सहभाग
ही मोहिम मुख्य तपासणी तिकीट निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखली राबवण्यात आली. त्यात एटीएस, आयसीपी, सजंग, ओडी तसेच तपासणी कर्मचारी सहभागी झाले. रेल्वे प्रवाशांनी तिकीट घेवून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

भुसावळात 13 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई
भुसावळ रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांना पायबंद लावण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचा प्रत्यय येत आहे. बुधवारी सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्लॅटफार्म क्रमाक पाच व सहावर अनधिकृतरीत्या खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍या 13 वेंडर्सवर कारवाई करीत 15 ट्रॉली जप्त केल्या. संबंधितांवर रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !