भुसावळ हत्यांकाड : चौथ्या आरोपीला 20 पर्यंत पोलिस कोठडी

भुसावळ : भुसावळचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अन्य एकावर कट रचून आलेल्या आरोपींनी अंधाधुंद गोळीबार तसेच चॉपरसह दगडाने हल्ला करून खून केल्याची घटना रविवार, 6 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अटकेतील तिघा आरोपींना पोलिस कोठडीचा हक्क राखून 24 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती तर खरात भावंडे घराबाहेर पडल्याची टीप आरोपींना दिल्याप्रकरणी चौथा आरोपी आकाश उर्फसागर सुकदेव सोनवणे (19, कवाडे नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आल्यानंतर त्यास 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी संपल्याने प्रचंड बंदोबस्तात आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.एस.पी.डोरले यांनी आरोपीला 20 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
हत्याकांडाच्या चौकशीसाठी पोलिस कोठडी
भुसावळातील हत्याकांडप्रकरणी शेखर हिरालाल मोघे उर्फ बॉक्सर (सात नंबर पोलिस चौकीजवळ, भुसावळ), मोहसीन अजगर खान उर्फ राज बॉक्सर (21, कवाडे नगर, भुसावळ) व मयुरेश रमेश सुरवाडे (20, आंबेडकर नगर, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली असून सुरुवातीला त्यांना 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती तर पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले केल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क राखून 24 पर्यंत न्यायालयीन कोठडी घेण्यात आली होती शिवाय या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध अॅट्रासिटीचा कलम वाढवण्यात आले होते. हत्याकांडापूर्वी आरोपींनी खरात भावंडांवर गोळीबार करीत चॉपरने त्यांचा खून केला होता मात्र खरात भावंडे घराबाहेर केव्हा पडतील याची माहिती मिळवण्यासाठी संशयीत आरोपी आकाश उर्फसागर सुकदेव सोनवणे (19, कवाडे नगर, भुसावळ) यास मयतांच्या घराजवळ थांबवले होते. खरात भावंडे दुचाकीवरून लाल चर्चकडे येत असल्याचे कळताच आरोपी आकाशने तिघाही आरोपींना त्याबाबत टीप दिल्याने त्यासही अटक करण्यात आली होती. आरोपीला सुरुवातीला न्यायालयाने 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती तर कोठडी संपल्याने त्यास बुधवारी प्रचंड बंदोबस्तात भुसावळ सत्र न्यायालयात न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे हजर करताच त्यास 20 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड.एस.डी.सोनवणे व अॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला.
