काय सांगता ! चक्क अवैध बायोडिझेल डेपोच जेबीने नष्ट केला ; जिल्ह्यातील या गावातील घटना
अक्कलकुवा : अवैधरीत्या बायो डिझेल विक्री करणारा डेपोच प्रशासनाने जेसीबी चालवून नष्ट केला. अक्कलकुवा तालुक्यातील उदेपूर येथे बुधवारी संध्याकाळी पाच वाजता महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. खापर परीसरात नेत्रंग शेवाळी महामार्गावर असलेल्या हॉटेल्स व ढाब्यांवर अनेक महिन्यांपासून अवैध बायोडिझेलची विक्री सुरू होती. दीड महिन्यांपुर्वी हॉटेल वेलकममधील हा डेपो सील करून मुद्देमाल जागा मालकाच्या ताब्यात दिला होता.
नियमांचा भंग केल्यानेच कारवाई
4 जानेवारी रोजी रात्री प्रांताधिकारी डॉ. मैनाक घोष व तहसीलदार सचिन मस्के यांनी खापर परिसरातील हॉटेल व ढाब्यांची अचानक तपासणी केली. हॉटेल वेलकमवरील सील केलेल्या बायो डिझेलची पाहणी करुन खातरजमा केली. त्यावेळी तेथे 5 हजार लिटरच्या दोन्ही प्लास्टिक टाकीत डिझेल होते. त्यामुळे प्रांताधिकार्यांच्या सूचनेनुसार जागा मालकास तात्काळ नोटीस बजावण्यात आली होती.


बायोडिझेलची केली विक्री
बुधवार, 5 जानेवारीला दुपारी 1 वाजता हॉटेल वेलकम येथे जागा मालकाकडे डिझेलची मागणी करण्यात आली मात्र जागा मालकाने ते देण्यास नकार दिला. जागेची पाहणी केली असता रात्रीच सील तोडुन प्लास्टिकच्या टाकीतील संपूर्ण बायोडिझेलची विक्री केल्याचे लक्षात आले. सर्व नियमांचा भंग केल्यामुळे हॉटेल वेलकम तसेच डिझेल डेपोवर कडक कारवाई करत जेसीबी फिरवण्यात आला. लोखंडी शेडमध्ये असलेले अनधिकृत हॉटेलसह लोखंडी तसेच डिझेलचे सिमेंट पत्र्याचे शेड नष्ट करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ.मैनाक घोष, तहसीलदार सचिन मस्के, नायब तहसीलदार गांगुर्डे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, उपनिरीक्षक राऊत, अमोल खवळे, तलाठी गणेश साखरे यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.





