आता या शहरातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
नाशिक : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवार 10 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी 31 जानेवारीपर्यंत पहिली ते नववीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील सर्व महाविद्यालयेही येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे घोषित केले आहे. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय पर्याय नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.







