भुसावळ डीआरएम विवेककुमार गुप्तांसह पत्नीची 25 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली


एलटीटी-निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील खळबळजनक घटना ः ग्वालियर लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल : डीआरएम सुरक्षित नसताना रेल्वे प्रवाशांची सुरक्षाही ऐरणीवर

भुसावळ : रेल्वे प्रवासात सर्वसामान्य प्रवाशांच्या बॅगा, रोकडसह मोबाईल लांबवण्याच्या घटना नवीन नाहीत मात्र चक्क भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्यासह त्यांच्या पत्नीची पर्सच चोरट्यांनी लांबवल्याची खळबळजनक घटना एलटीटी-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी रात्री 12 नंतर घडली. या घटनेते चोरट्यांनी 25 हजारांची रोकड लांबवली असून या घटनेने रेल्वे प्रशासन पुरते हादरले आहे. ग्व्हॉलियर लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वेच्या डीआरएम यांच्यासह त्यांच्या पत्नीची पर्सच रेल्वेत चोरीला गेल्याने वरीष्ठ अधिकारीच सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्य प्रवाशांचे काय? हे न विचारलेलेच बरे असादेखील सूर आता उमटत आहे.

नवी दिल्लीत जाताना चोरट्यांचा 25 हजारांवर डल्ला
नवी दिल्लीतील रेल्वे बोर्डात ग्रीन हरीत लवादाची बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी बैठक असल्याने भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता व त्यांच्या पत्नी नीता या मंगळवारी रात्री नऊ वाजता डाऊन 22109 एलटीटी-निजामुद्दीन एसी एक्स्प्रेसने रवाना झाले. एच-1 कोचच्या बर्थ क्रमांक पाच व सहावरून प्रवास करणार्‍या गुप्ता दाम्पत्याला मध्यरात्री झोप लागल्याने डीआरएम गुप्ता यांनी त्यांच्याकडील 20 हजारांची रोकड तसेच सौ.गुप्ता यांनी त्यांच्याकडील पाच हजारांची रोकड असलेले वॉलेट एका पर्समध्ये ठेवत ही पर्स सीटखाली ठेवले. पहाटे साडेपाच ते साडेसहा दरम्यान दाम्पत्याला जाग आल्यानंतर पर्स चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रेल्वे प्रशासन व अटेण्डटला माहिती दिली तर चक्क डीआरएम यांच्यासह त्यांच्या पत्नीची रोकड असलेली पर्स चोरीला गेल्याचे कळताच रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली.

ग्वाल्हेरमध्ये अधिकार्‍यांची धावपळ
डीआरएम यांची पर्स लांबवल्याची घटना कळाल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये बुधवारी सकाळी सात ते आठ वाजेदरम्यान एक्स्प्रेस आल्यानंतर लोहमार्ग तसेच रेल्वे सुरक्षा बलासह अधिकार्‍यांनी डीआरएम गुप्ता यांची भेट घेत माहिती जाणून घेतली. कोच अटेण्डेंट तसेच पँट्री कार कर्मचार्‍यावर संशय असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात आली मात्र चोरी झालेल्या पर्सबाबत काहीही माहिती कळू शकली नाही. ग्वाल्हेर लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. झांशी वा त्यापूर्वी ही चोरी झाल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला आहे.

तर सर्वसामान्य प्रवाशांचे काय ?
भुसावळ रेल्वेचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्यासह त्यांची पत्नीची चोरट्यांनी पर्स लांबवल्याने सुरक्षा यंत्रणेने खळबळ उडाली असताना दुसरीकडे वरीष्ठ अधिकारी ज्या रेल्वेत सुरक्षित नाही तेथे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. डीआरएम गुप्ता यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !