काय सांगता ! : नवरी निघाली चक्क दोन मुलांची आई
जयपूर : लग्नाच्या बहाण्याने या फसवणुकीच्या घटना नवीन नाहीत शिवाय विविध क्लुप्त्या लढवून फसवणुकीचे प्रकारही उघड होतात मात्र चक्क लग्न झालेली तरुणी दोन मुलांची आई निघाल्याने नवरदेवाला मात्र डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे. ही घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडली. पोलिसांनी एका नव्या नवरीला आणि तिच्या काही साथीदारांना अटक केली आहे. या नवरीवर तिने दलालाच्या माध्यमातून आधी तीन लाख रुपये घेतले आणि खोट्या पद्धतीने लग्न केल्याचा आरोप आहे.
शंका आली आणि फुटले बिंग
मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील एका व्यक्तीचे लग्न ठरत नव्हते. त्यादरम्यान, त्याची जुझाराम नावाच्या एका व्यक्तीशी भेट झाली. त्याने या व्यक्तीला त्याचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर लग्नाळू व्यक्तीने त्याच्या भावाशी बोलून घेतले. तसेच २७ डिसेंबर रोजी बाडमेरमधील कोर्टात सदर व्यक्तीचे एका महिलेसोबत लग्न लावून दिले जाते. नववधूची ओळख पंजाबमधील कोडाबाई अशी झाली आहे. लग्नाच्या १० दिवसांपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. त्यानंतर दलाल नवऱ्याला फोन करून महिलेच्या कुटुंबात लग्न असल्याचं सांगितलं. तसेच तिला पंजाबमध्ये पाठवण्यास सांगितले मात्र त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात शंका उपस्थित झाली. त्यांनी नवरीकडे चौकशी केली तेव्हा तिने सर्व काही कथन केले. तिने सांगितले की, माझं आधीच लग्न झालेलं आहे. मला दोन मुलं आहेत. मला सोडा, अशी विनवणी तिने केली. त्यानंतर नवऱ्याचा भाऊ आणि आणि अन्य एकाने मिळून या महिलेला पोलीस ठाण्यात आणले. तिथे पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीमुळे नवऱ्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला.





