भुसावळात एकावर चाकू हल्ला : दोघांना अटक

भुसावळ : किरकोळ कारणावरून एकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. निलेश चंद्रकांत ठाकुर (19) तसेच निखील सुरेश राजपूत (25, दोघे रा.दत्त नगर वांजोळा रोड, भुसावळ) यांना अटक करण्यात आली.
किरकोळ कारणावरून मारला होता चाकू
15 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नवरंग चौकातील, श्रीराम नगराजवळ तक्रारदार जीवन संजय देशमुख व दोघा आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद ओढवला होता. यावेळी आरोपी निखीलने जीवन यांचे हात पकडले होते तर आरोपी निलेश ठाकूरने आपल्या कंबरेला लावलेला चाकू काढत तक्रारदाराच्या हातावर तसेच पोटावर उजव्या बाजूला वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात आरोपींविरुद्ध 17 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी पसार झाले होते.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
आरोपी निखील हा बाजारपेठ पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार असून तो हद्दपार आहे तर दुसरा आरोपी निलेश ठाकूरविरुद्ध शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या अटकेचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिले होते. आरोपी गुरुवारी रात्री श्रीराम नगर भागात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, शंकर पाटील, रमण बिर्हाडे, रमण सुरळकर, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, प्रशांत चव्हाण, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.
