नंदुरबार एस.टी.आगारातील दोन कर्मचार्यांचा मृत्यूने खळबळ
आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : कर्मचारी संतप्त
नंदुरबार : नंदुरबार एस.टी.आगारातील दोन कर्मचार्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडल्याने कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली. एस.टी.महामंडळाकडून होत असलेल्या त्रासामुळे दोन्ही संपकरी एसटी कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संपकरी एसटी कर्मचार्यांनी नंदुरबार बस स्थानकात एकत्र येऊन मयत कर्मचार्यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत तीव्र भावना व्यक्त केल्या.
तो पर्यंत मृतदेह न उचलण्याचा इशारा
मयत कर्मचार्यांचा मृतदेह नंदुरबार आगार प्रमुख यांच्या कार्यालयातून ठोस कारवाई होईपर्यंत उचलणार नसल्याचा इशारा दिला त्यामुळे नंदुरबार शहर पोलिसांनी तत्काळ नंदुरबार बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.

अडीच महिन्यांपासून संप कायम
गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. आपल्या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम असून कर्मचार्यांना कामावर रुजू न झाल्यास एसटी महामंडळाकडून नोटिसा बजावण्यात येत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कारवाईच्या धास्तीने काही कर्मचार्यांची प्रकृती बिघडली असून काही कर्मचार्यांनी या आंदोलनात बलिदान दिल्याचे एस.टी.कर्मचार्यांकडून सांगण्यात येते. लालपरीची चाके बंद असून संप सुरू असल्याने नंदुरबार आगारातील दोन एसटी कर्मचार्यांचा हृदयविकाराने मृत्यू मंगळवारी, 18 जानेवारी 2022 रोजी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या जाचक कारवाईमुळे दोन्ही एसटी कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचार्यांकडून केला जात असून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे.
दोन कर्मचार्यांच्या मृत्यूने खळबळ
नंदुरबार आगारातील कंडक्टर युवराज सुका भिल (52) व चालक अनिल चौरे वाघाळेकर (45) या दोन कर्मचार्यांचा हृदयविकाराने मंगळवारी मृत्यू झाला. हा मृत्यू एस.टी.महामंडळाच्या जाचक कारवाईमुळे झाल्याचा आरोप करीत दुखवटा म्हणून नंदुरबार आगारात कर्मचार्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तात्काळ दाखल होत संपकरी कर्मचार्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत समजूत काढण्यात आली. परंतु मयत कर्मचारी मृत्यूप्रकरणी दोषी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा, या मागणीवर एस.टी.कर्मचारी ठाम असून दोन एस.टी.कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याने तीव्र निषेध नोंदवला आहे.







