भुसावळात आमदार संजय सावकारेंच्या महाप्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही महारॅलीत सहभागी : ढोल-ताशांचा गजर, महिला भजनी मंडळांनी वेधले लक्ष
भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शनिवार, 19 रोजी सकाळी 11 वाजता जामनेर रोडवरील भाजपा प्रचार कार्यालय, दर्डा भवनापासून महारॅलीला सुरुवात झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महायुतीचे उमेदवार व आमदार संजय सावकारे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, भाजपा गटनेता मुन्ना तेली, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे, उद्योजक मनोज बियाणी, हाजी शेख शरीफ, आदींनी उघड्या वाहनावरून मतदारांना अभिवादन केले. याप्रसंगी ढोल-ताशांचा गजर करण्यात आला तसेच भजनी मंडळही महाप्रचार रॅलीत सहभागी झाले. या प्रसंगी महारॅलीवर पुष्पवृष्टी करून मंत्री महाजन व आमदार सावकारे यांचे स्वागत करण्यात आले.
रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत
निवडणूक प्रचार कार्यालयापासून ही प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅली अष्टभुजा देवी, नृसिंह मंदिर, सराफ बाजार, मॉडर्न रोड, लोखंडी पूल, सातारा आदी परीसरात फिरून निवडणूक प्रचार कार्यात विसर्जित करण्यात आली. प्रचार रॅली मध्ये भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी , तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, रजनी सावकारे, नगरसेविका चेतना महाजन, नगरसेविका प्रीतमा गिरीश महाजन , यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.
