भुसावळात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावल्यानंतर मतदाराचा मृत्यू

भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी मतदान करून घरी परतलेल्या व व्यवसायाने हमाल असलेल्या 35 वर्षीय इसमाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. विजय त्र्यंबक तायडे (36, रा.महात्मा फुले नगर) असे मृत मतदाराचे नाव आहे. विजय तायडे हे डेलि बाजारात हमाली करून कुटुंबाची उपजिवीका भागवतात. सोमवारी सकाळी 11.30 वाजता त्यांनी भुसावळ हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला व दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. खाजगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आल्यानंतर जळगाव हलवण्याचा सल्ला देण्यात आला मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा परीवार आहे. ते येथील जगदीश त्रयंबक तायडे यांचे बंधू होत. सोमवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
