भुसावळात बसस्थानकाची दुरवस्था : प्रवासी त्रस्त

रीपरीप पावसामुळे बसस्थानकात साचले तळे


भुसावळ : तीन दिवसापासुन सुरू असलेल्या रीपरीप पावसामूळे भुसावळ बसस्थानकावर व लगतच्या मार्गावर पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. बसस्थानक व लगतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचले आहे.परीणामी, स्थानकावरील प्रवाशांना व बसस्थानकालगतच्या मार्गावरून मार्गक्रमण करणार्‍या वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

बसस्थानक प्रशासनाच्या कारभारविषयी संताप
रेल्वेच्या जंक्शन स्थानकालगतच बसस्थानक असल्याने या बसस्थानकावर प्रवाशांची बर्‍या पैकी गर्दी असते.मात्र,बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना नियमीत अडचणीचा सामना करावा लागतो. बसस्थानकावर बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकांची झालेली दुरावस्था, मोकाट गुरांमूळे निर्माण होणारी अस्वच्छता व दुर्गंधीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.इतकेच नव्हेतर स्थानकावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून पाऊस पडताच या खड्ड्यांमध्ये पाणी साचते.यामूळे आपल्या इच्छीतस्थळी जाणार्‍या बसकडे जाण्यासाठी प्रवाशांना साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच वाट काढीत बसकडे धाव घ्यावी लागते.या प्रकाराने वयोवृद्ध प्रवाशांना तर फार मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने बसस्थानक प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

खड्डे चुकवताना वाढताय वाद
बसस्थानकावरून मुक्ताईनगर , वरणगाव, जामनेर, जळगाव व रावेर आदी भागाकडे जाणार्‍या बसेससाठी मुख्य मार्ग आहे.तसेच हा मार्ग शहरातील वाहनधारकांचाही मुख्य मार्ग असून या मार्गावरून रात्रं-दिवस वाहनांची वर्दळ सुरू असते.मात्र, मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या मार्गावरून वाहनधारकांना मार्गक्रमण करतांना अडचणीचा सामना करावा लागतो.इतकेच नव्हेतर पावसामूळे निर्माण झालेल्या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांच्या अडचणीत अधिकतेची भर पडते.यामूळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनधारकांमध्ये होणारी शाब्दीक चकमक नित्याचीच झाली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !