भुसावळात आमदार संजय सावकारेच साधणार हॅट्रीक !
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास : मतदानाचा टक्का घसरला मात्र विजय निश्चित

भुसावळ : भुसावळ विधानसभेची निवडणूक अखेरच्या वळणावर अत्यंत चुरशीची झाली मात्र मतदानाचा टक्का घसरल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार व कोण पराजयी होणार? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असलेतरी भाजपाच्या पदाधिकार्यांनी मात्र आमदार संजय सावकारे हेच विजयी होवून हॅट्रीक साधतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानाचा टक्का पावसामुळे घसरला शिवाय दुपारून पाऊस उघडला असलातरी दिवाळीच्या धामधूमीत नागरीक व छोटे व्यापारी खरेदी-विक्रीच्या लगबगीत अडकल्याने मतदान अल्प झाले, असा सूरही उमटला.
नेत्यांची खंबीर साथ, विजय हमखास -प्रा.सुनील नेवे
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांची खंबीर साथ लाभल्याने आमदार संजय सावकारे यांचा विजय निश्चित आहे. आमदार म्हणून गेल्या दहा वर्षात केलेली उत्कृष्ट कामगिरी शिवाय भ्रष्टाचारमुक्त कारभार ही त्यांची जमेची बाजू असून विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के हमखास यश मिळेल, असा विश्वास प्रा.नेवे यांनी व्यक्त केला.बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मोठ्या मताधिक्याने आमदार विजयी होतील, असेही ते म्हणाले.
हॅट्रीक साधणार -शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे
सलग दोन टर्मपासून असलेले आमदार संजय सावकारे या निवडणुकीत हॅट्रीक साधतील, असा विश्वास शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, ग्रामीण भागात केलेली रस्त्यांची कामे, पालिकेत मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी असलेले योगदान व सर्वांना सोबत घेवून चालण्याची वृत्ती या गुणांमुळे आमदार निश्चित विजयी होतील, असेही नारखेडे म्हणाले.
विजय निश्चित -नगरसेवक युवराज लोणारी
राज्यात देवेंद्र फडणवीस व केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने केलेली कामे शिवाय आमदार संजय सावकारे यांची स्वच्छ प्रतिमा, भाजपाचे मजबूत संघटन तसेच कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे आमदारांचा विजय निश्चित आहे तर 40 हजारांच्या लीडने ते विजयी होतील, असा आशावाद नगरसेवक युवराज लोणारी यांनी व्यक्त केला.
प्रत्येक समाज पाठीशी -नगरसेवक पिंटू कोठारी
सर्वांना सोबत घेवून चालणारे व्यक्तीमत्व असल्याने तसेच प्रत्येक समाज या निवडणुकीत पाठीशी असल्याने आमदारांचा विजय निश्चित असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला रीपरीप पाऊस व त्यातच निवडणुकीच्या दिवशी दुपारून उघडीप मिळाली असलीतरी दिवाळी असल्याने छोटे व्यावसायीक व नागरीकांनी खरेदीसाठी बाजारपेठ गाठल्याने मतदानाचा टक्का कमी झाल्याचेही ते म्हणाले.
50 हजारांचे मताधिक्क मिळणार -रवी निमाणी
स्वच्छ प्रतिमा असलेले आमदार संजय सावकारे तिसर्यांदा हॅट्रीक साधतील शिवाय 50 हजारांचा त्यांना लीड मिळेल, असा विश्वास रवी निमाणी यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात रस्त्यांसह विविध विकासकामे करण्यात आली असल्याने निश्चित विजय असल्याचेही निमाणी म्हणाले.
