बोदवडला विजेच्या धक्क्याने म्हशींसह गोर्ह्याचा मृत्यू

बोदवड : तुटलेल्या विज तारांना स्पर्श होवून दोन म्हशींसह गोर्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. या घटनेने शेतकर्यावर संकट कोसळले आहे. सुपडू माधव बडगुजर (40) यांच्या मालकीच्या दोन म्हशी व एक गोर्ह्याचा या घटनेत मृत्यू झाला असून या म्हशींची अंदाजीत एक लाख 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक असलेल्या वखार महामंडळाच्या पडीत असलेल्या जागेत म्हशी व काही गुरे चरण्यास सोडल्यानंतर अचानक वीज वाहक तार तुटली तर म्हशीसह गोर्ह्याला धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. वीज वितरण कंपनीचे उप अभियंता प्रफुल्ल कोकाटे यांनी घटनास्थळाचा अहवाल जळगाव येथे पाठवला असून वरीष्ठ अधिकार्यांकडून पाहणी होणार असल्याचे सांगण्यात आले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.पाचपांडे, डॉ.वाघोदे, डॉ.पिचड यांनी मृत म्हशींचा पंचनामा केला.
