भुसावळातील वृत्तपत्र हॉकर्सची दिवाळी झाली ‘गोड’

विघ्नहर्ता पब्लिकेशन्सने जपली माणुसकी : सणानिमित्त मिठाईसह कपड्यांची भेट
भुसावळ : वृत्तपत्र हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असलातरी ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वृत्तपत्र वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका हे वृत्तपत्र हॉकर्स ही मंडळी निभावत असते. प्रतिकुल परीस्थितीत काम करून आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणार्या हॉकर्स बांधवांप्रती संवेदना जोपासत भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी यांनी शनिवारी सायंकाळी दिवाळी सणाचे औचित्य साधून सुमारे 70 हॉकर्स बांधवांना साडी, डे्रस व मिठाईचे वाटप करून समाजात अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय दिला. निमाणी यांच्या उपक्रमाचे सर्वच वृत्तपत्र वाटप करणार्या हॉकर्स बांधवांनी मनपूर्वक कौतुक करीत आभारही मानले.
यांची होती उपस्थिती
छोटेखानी कार्यक्रमास विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवींद्र निमाणी, बडोद्याच्या लुसी इलेक्ट्रीकलचे संचालक मुकेश निमाणी, भुसावळ दिव्य मराठी कार्यालयाचे ब्युरोचीफ हेमंत जोशी, भुसावळ जनशक्ती विभागीय कार्यालयाचे प्रमुख गणेश वाघ, जय निमाणी, अर्हम निमाणी, पूर्वी निमाणी, कर्मचारी संगीता बेदरकर, बबलू ठाकूर, दाऊदी ढोलकावाला यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
