भुसावळात शॉक लागून दोघा तरुणांचा मृत्यू


श्रद्धा नगरातील घटना : डिजिटल बॅनरची लोखंडी फे्रम 11 केव्ही वाहिनीला लागली

भुसावळ : नवीन ई- सेवा केंद्राचा फलक नेताना 11 केव्हीच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने शहरातील श्रध्दा नगरातील रहिवासी राजेश मंगलदास देवगिरे (28) व त्याचा मित्र शुभम गजानन वानखेडे (19) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवर श्री गजानन महाराज मंदिराजवळ घडली. भाऊबिजेच्या दिवशी झालेल्या या घटनेने दोन्ही घरातील एकुलत्या मुलांना जीव गमवावा लागल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आले.

कुटुंबाने फोडला टाहो
भाऊबीजेच्याच दिवशी नवीन व्यवसायाचा फलक मोटारसायकलने घेऊन जात असलेल्या दोन्ही युवकांच्या हातातील लोखंडी फलकाला हाय टेन्शन तारेचा स्पर्श झाल्याने राजेश आणि शुभम यांचा मृत्यू झाला. दोन्हीही तरुण कुटुंबातील एकुलते एक होते. राजेश याचे वडीलांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर पोलिस खात्यात हा येत्या दोन महिन्यात नोकरीला लागणार होता. राजेश हा घरातील एकमेव कर्ता पुरूष होता तर शुभम हा सुध्दा एकुलता एक होता. भाऊबीजेच्याच दिवशी झालेल्या या घटनेने श्रध्दा नगर व अशोक नगरात शोककळा पसरली आहे. दोन्ही मित्रांनी दिवाळीच्या दिवशी आपले सरकार हे ऑनलाईन ई सुविधा केद्र सुरू केले होते. त्या दुकानावर फलक लावण्यासाठी ते जात होते. फलक घेऊन जात असतांनाच ही घटना घडली. राजेश याचे वडील पोलिस विभागात होते, त्याच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर राजेश त्यांच्या जागेवर नोकरीला लागणार होता. राजेशच्या पश्‍चात तीन बहिणी, आई आहे तर शुभमच्या बहिण, आई, वडील असा परीवार आहे.

अंडर ग्राऊंड वायरींग होणार

वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता बी.आर.घोरूडे म्हणाले की, या भागात अंडरग्राऊंड वायरींग मंजूर असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !