खामखेड्यात नागरीकांच्या घरासह गल्ली-बोळात पाणी शिरले पाणी
मुक्ताईनगर : तालुक्यातील खामखेडा येथे गल्ली-बोळात तसेच काही ग्रामस्थांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींविषयी तीव्र संताप व्यक्त करीत शिवसेना प्रमुखांकडे गार्हाणे मांडले. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही दखल घेतली जात नसल्याने चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांची भेट घेत त्यांना खामखेडा गावात आणले. अधिकार्यांनी गावाची पाहणी करीत तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले.
शाळेला गळती, गावात साचले वाणी
ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वीच शाळा खोल्यांचे बांधकाम केले असलेतरी कामाचा दर्जा न राखला गेल्याने शाळा खोल्यांना गळती लागली आसून या संदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांकडे लेखी तक्रार केली आहे शिवाय संततधार पाऊस सुरू असताना एका लोकप्रतिनिधीने पावसाच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा होईल असा मुरुमाचा भराव टाकून ठेवल्यामुळे गावातील प्रत्येक गल्लीत पाणी साचल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खामखेडा रहिवाशांनी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतल्यानंतर पाटील यांनी तत्काळ गावकर्यांसह तहसीलदारांचे दालन गाठले. जिल्हाप्रमुख पाटील व तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार झांबरे आदींनी गावाला भेट देत पाण्याची पाहणी करीत कारवाईचे आश्वासन दिले.
पूरस्थितीत दिले ग्रामस्थांनी निवेदन
दरम्यान, स्थळ पाहणीसाठी आलेल्या तहसीलदार शाम वाडकर यांना पुरस्थितीतच नागरीकांनी जिल्हाप्रमुख पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. निवेदन देतेवेळी ईश्वर पाटील, सुपडू पाटील, रामदास गवते, योगेश पाटील, रमेश पाटील, विजय जुमळे, राजू वाघ, अनिल वाघ, योगेश गावळे, सुधाकर पाटील, संदीप पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.