साकरी शिवारातील नवीन वसाहतीमध्ये असुविधांचा कहर

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : ग्रामस्थांचे आरोग्य आले धोक्यात : उपाययोजना करण्याची मागणी
भुसावळ : तालुक्यातील साकरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निंभोरा बुद्रुक येथील नवीन वसाहतीमधील नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या विस्तारीत भागात रस्ते, गटारी व पिण्याच्या समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत तसेच रीपरीप पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले असून डासांचा उपद्रव वाढत आहे. परीणामी रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने दखल घेवून उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
कर भरूनही रहिवासी सुविधांपासून वंचित
तालुक्यातील साकरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत दीपनगर वीज प्रकल्पासमोर निंभोरा बुद्रुक गावालगत नविन वसाहत निर्माण झाली आहे. साकरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गट क्रं.74/1 अ मध्ये वीज निर्मीती केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचार्यांची वसाहत निर्माण झाली आहे मात्र साकरी ग्रामपंचायतीचा सर्व प्रकारच्या कराचा भरणा करूनही या भागातील रहीवाशांना मुलभुत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. या विस्तारीत भागात शासनाच्या कुठल्याच निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले नसल्याने रहिवाशांना पावसाळ्याच्या दिवसात अडचणीचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागते. पिण्याचे पाणीही कमी दाबाने मिळत असल्याने रहिवाशांना मुबलक पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हेतर या भागात पथदिवे लावण्यात आले नसल्याने रात्री अंधकारमय मार्गावरून नागरीकांना अडचणीचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागते. रात्री अंधाराचा फायदा घेवून भुरटे चोर सक्रीय झाले असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे साकरी ग्रामपंचायतीने या समस्यांची दखल घेवून या भागातील रहिवाशांना मुलभुत सुविधा पुरवून दिलासा देण्याची मागणी होत आहे.
गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर
ग्रामपंचायतीने या रहिवाशी भागात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींचे बांधकाम केले नसल्याने सांडपाणी रस्त्यावर अथवा लगतच्या बखळ प्लॉटमध्ये सोडावे लागत आहे. परीणामी दुर्गंधी सुटुन डासांचा उपद्रव वाढत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रहिवाशांनी साकरी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली मात्र नागरीकांच्या मागणीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या
या रहिवासी भागातील नागरीकांनी ग्रामपंचायतीच्या भरवश्यावर न राहता खाजगी कुपनलिकांचा आधार घेतला आहे मात्र उन्हाळ्यात भुगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने अनेकांच्या कुपनलिकांचे पाणी कमी झाल्याने रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. यावेळी एका टँकरने या भागातील नागरीकांची तृष्णा भागवण्यात आली होती. यानंतर रहिवाशांच्या मागणीमुळे तात्पुरती पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली मात्र या योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने रहिवाशांना मुबलक पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
कराचा भरणा करूनही असुविधा
या भागातील रहिवासी वीजनिर्मिती केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी असून सर्व रहिवाशी ग्रामपंचायतीच्या विविध करांचा भरणा नियमीत करीत आहेत मात्र असे असूनही साकरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रहिवाशांना आवश्यक सुविधाकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे काही रहिवाशांनी सुविधा उपलब्ध न झाल्यास ग्रामपंचायतीचा लागू असलेल्या कराचा भरणा न भरण्याच्या भूमिकेत आहेत.
