भुसावळात विद्यार्थ्याला दुचाकीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

भुसावळ : शिकवणीवरून परत येत असलेल्या विद्यार्थ्याला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चॉपरचा धाक दाखवून पळवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच विद्यार्थ्यांने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांनी त्याला वाटेत सोडून पळ काढल्याची घटना मंगळवारी घडली. बाजारपेठ पोलिसात मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन वेळा फसला चोरीचा प्रयत्न
समजलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबरच्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास लक्ष्मीनारायण नगरात दुचाकीवरुन चोरटे आले मात्र रहिवाशांना चोरट्यांची चाहूल लागल्याने चोरटे दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.सी.7233) घटनास्थळी सोडून पसार झाले तर या घटनेनंतर पहाटे तीन वाजता घटनास्थळी एक महिला व एका मुलाने दुचाकीवर दावा करीत दुचाकीचा ताबा मागत वाद घातला. रहिवाशांनी ती दुचाकी पोलिस ठाण्यात जमा केली मात्र रविवारी रात्री पुन्हा या परीसरात तीन चोरटे दुचाकीवर आले. त्यातील एकाकडे चॉपर असल्याची माहिती रहिवाशांनी दिली तर रहिवाशांना जाग आल्याने तिन्ही चोरट्यांनी पळ काढला मात्र पसार होताना चोरट्याच्या हातातील चॉपरची मूठ घटनास्थळी पडली. ती मूठ रहिवाशांनी पोलिसांकडे जमा केली. दोनवेळा चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर मंगळवारी याच परीसरात विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या घटनेमागे चोरट्यांचाच हात असल्याचा संशय आहे. या घटनेनंतर परीसरातील रहिवाशांनी मंगळवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिसांनी या भागात रात्री तसेच दिवसा गस्त करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मंगळवारी याच परीसरातील रहिवासी असलेला विद्यार्थी शिकवणीवरून दुपारी चारच्या सुमारास घरी येत होता. वाटेत दुचाकीवरील संशयितांनी त्याला चॉपरचा धाक दाखवत बळजबरीने दुकाचीवर बसवले. मुलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांनी मुलास तेथेच सोडून पळ काढला. याप्रकरणी डीवायएसपी गजानन राठोड यांनी तत्काळ संशयीत ज्या मार्गाने गेले, त्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.
