पूरग्रस्तांसाठी धावले बारामतीकर ; शरद पवारांच्या आवाहनानंतर अर्ध्या तासात एक कोटींची मदत
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूर ग्रस्तांना मदतीसाठी आवाहन करताच अवघ्या अर्ध्या तासात तब्बल कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवनामध्ये व्यापारी, नागरीक, विविध संस्थांचे पदाधिकारी आदींची बैठक शरद पवार यांनी घेतल्यानंतर त्यांनी आवाहन करताच सकारात्मक प्रतिसाद लाभला. सांगली जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 25 लाख रुपये, तर कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 25 लाख असे एकूण 50 लाख रुपये एकट्या विद्या प्रतिष्ठानच्या वतीने देण्याची घोषणा शरद पवार यांनी या वेळी केली.
बारामतीकरांनी दिला संवेदनशीलतेचा प्रत्यय
‘बारामती तालुका पूरग्रस्त निधी’ असे बँकेत खाते उघडावे व त्यामध्ये थेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रक्कम वर्ग करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या. ज्या स्वरूपात मदत दिली जाईल, त्याची पावती देण्याचीही सूचना पवार यांनी या वेळी केली. रयत भवन येथून ही मदत पूरग्रस्त भागांमध्ये गरजेनुसार पाठवली जाणार असल्याचे शेवटी शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, बारामती मर्चंट असोसिएशन आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ट्रक धान्य, छत्रपती सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी 100 पोती साखर, तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 51 साखरपोत्यांची मदत करण्यात आली.