रावेर लोकसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा

खासदार रक्षा खडसे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
मुक्ताईनगर : परतीच्या पावसामुळे मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, भुसावळ या तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश परीस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांचा तोंडी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकर्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. यामुळे कृषी व महसूल विभागाने तातडीने अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत व त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने रीपरीप सुरू ठेवल्याने खरीप हंगामातील वेचणीला आलेली कपाशी, कापणीला आलेली ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेले पीक काळे पडले आहे.तसेच ज्वारी, बाजरी काळी पडली असून मका व चार्याचे नुकसान झाले असल्याचे शेतकर्यांनी संपर्क करून कळविले आहे. सगळ्यात जास्त फटका कापसाला बसला आहे. कापूस खाली गळून पडल्याने अपेक्षित आलेले उत्पन्न बुडणार आहे. कापूस पिवळा व काळा पडला असून झाडावरच कोंब फुटल्याने शंभर टक्के शेतकर्यांचे नुकसान झाल्याचे परीस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्यांच्या हाताशी आलेले उत्पन्न परतीच्या पावसाने उध्वस्त झाले आहे. शेतकर्यांना आर्थिक संकटात नेणार्या अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी भागाने तातडीने करावेत आपल्या संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना करावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकान्वये केली आहे.
