माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंसह शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांचा फोन टॅप
मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या फोन टॅपींगप्रकरणी अडचणीत आल्या असतानाच त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला होता मात्र कुलाबा पोलिस ठाण्यात नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांच्यावरील हा तिसरा गुन्हा आहे.
परवानगीविनाच फोन टॅपींगचा आरोप
सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये (सीआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असताना त्यांनी कोणत्याही परवानगीविना विविध पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला सुपूर्द करण्यात आला. सरकारने अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्याच्या बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


फोन टॅपींगमुळे उडाली खळबळ
काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला होता. अशाच प्रकारे गुन्ह्याच्या तपासाचे कारण पुढे करून, टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांचेही फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. एकनाथराव खडसे यांचा फोन टॅप करण्यात आला तेव्हा ते भाजपमध्ये होते. यामुळे एकीकडे विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करतांना भाजपमधीलच नाथाभाऊ आणि तेव्हा मित्रपक्ष असणार्या शिवसेनेतील संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप हा राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा ठरला आहे.
कुलाबा पोलिसात गुन्हा
दरम्यान, मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला या़च्या विरोधात नव्याने नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात शुक्ला यांनी पदाचा गैरवापर करून 1 नोव्हेंबर 2019 मध्ये खासदार संजय राऊत यांचे फोन टॉप केल्याचं यामध्ये नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांचाही ते भाजपात असताना म्हणजेच ऑगस्ट 2019 दरम्यान फोन टॅप केल्याचं समोर आलं आहे. विधीमंडळ समितीच्या चौकशीत हा प्रकार समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. या चौकशीसाठी तीन अधिकार्यांची समिती नेमण्यात आली होती. या कमिटीने 2015 ते 2019 दरम्यान फोन टॅपिंगची चौकशी केली.


