शेताच्या बांधापर्यंत जावून नुकसानीचे पंचनामे करा -तहसीलदार उषाराणी देवगुणे

रावेर : रावेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे ज्वारी, कपाशीसह, मक्याचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधापर्यंत जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले. नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल, कृषी आणि पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचार्यांची त्यांनी बैठक घेतली. रावेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने तत्काळ शेतकर्यांच्या बांधापर्यंत जावून त्यांच्या शेतात झालेला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांनी केल्या.
यांची होती उपस्थिती
तालुक्यात ज्वारीसह मका, कपाशीचे मोठे नुकसान झाल्याने तहसीलदारांनी महसूल, कृषी विभाग व पंचायत समितीच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक महसूल कार्यालयता धेतली. प्रसंगी गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे, कृषी अधिकारी साळुंखे, सहाय्यक बीडीओ हबीब तडवी, नायब तहसीलदार संजय तायडे, पवार तसेच तालुक्यातील सर्व तलाठी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, सर्व ग्रामसेवक या बैठकीला उपस्थित होते.
विमा असलेल्या शेतकर्यांनी कागदपत्रे सादर करावीत
रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस थांबला असून शेतकर्यांच्या ज्वारीसह मका, कपाशीच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकर्यांच्या प्रत्यक्ष गावात जाऊन त्यांच्या शेतात पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्याचे तहसीलदार म्हणाल्या. ज्या शेतकर्यांनी पीक विमा काढला असेल त्यांनी आपली कागदपत्रे पंचनामा करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांकडे जमा करण्याचे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.
