दरभंगा-बागमती एक्स्प्रेसमधून दोन कोटींचे सोने-चांदी जप्त : या रेल्वे स्थानकावर कारवाई
बिहारातील युवकांकडून सोन्या-चांदीसह दोन कोटींचे दागिने जप्त


चंद्रपूर : तामिळनाडूतील त्रिपूर येथे एका सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा घालून चार युवक दरभंगा-बागमती एक्स्प्रेसने दरभंगाकडे पळून जात असल्याची माहिती बल्लारशाह रेल्वे सुरक्षा बलाला मिळाल्यानंतर रेल्वेगाडी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर येताच सापळा रचून बिहारातील चौघा तरुणांना अटक करण्यात आली. महताब आलम अयुब खान (37), बदरुल जहाँगीर खान (20), मोहम्मद सुभान अब्दुल वाहिब (30) व दिलकस मोहम्मद आरीफ (20, सर्व रा. अरेरिया) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पावणेदोन कोटींचा ऐवज जप्त
बल्लारशाह रेल्वेस्थानकावर सकाळी म्हैसूर ते दरभंगाकडे जाणार्या 12578 या दरभंगा बागमती एक्स्प्रेसमध्ये चार संशयित युवकांना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तब्बल 3 किलो 710 ग्रॅम सोने (किंमत 1 कोटी 76 लाख 831 रुपये), 27 किलो चांदी (किंमत 19 लाख 58 हजार 40 रुपये) व 14 लाख 52 हजार 100 रुपये रोख असा एकूण तब्बल 2 कोटी 10 लाख 67 हजार 971 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटकेतील चारही आरोपी बिहार राज्यातील आहेत.
ठिकठिकाणी लपवला मुद्देमाल
प्लॅटफार्म क्रमांक 5 वर हे चारही आरोपीला बोगी क्रमांक 7, 9 व एसी बोगी क्रमांक 3 मधून प्रवास करीत होते. पकडले जाऊ नये, म्हणून त्यांनी मुद्देमाल वेगवेगळ्या बोगींमध्ये सीटखाली बॅग्ज व गोणींमध्ये लपवून ठेवला होता.
यांनी केली कारवाई
ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्रकुमार मिश्रा, नवीनप्रताप सिंग, उपनिरीक्षक प्रवीण महाजन, प्रवीण गाडवे, सहायक डी. के. गौतम, राम लखन, तसेच रामवीर सिंग, डी. एच. डुबल आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. यावेळी एक आरोपी पळून जात होता. त्याला धावून शिताफीने पकडले. हा सगळा प्रकार रेल्वेतील स्थानकावरील प्रवासी बघत होते.
आरोपींना तामिळनाडूकडे सुपूर्द करणार
हे सर्व आरोपी त्रिपूर येथे दरोडा घालून बिहारकडे दरभंगा बागमती एक्स्प्रेसने पळून जात होते. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची ओळख पटताच त्रिपूर पोलिसांनी सूत्र हलविले. यानंतर पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, हे चारही आरोपी दरभंगा एक्स्प्रेसने जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. त्यांना आता तामिळनाडू पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.


