भाजपा कारभाराचा निषेध : देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर फेकल्या चपलांसह बांगड्या
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चपला आणि बांगड्या फेकत निषेध केला. भाजपच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला रविवारी वेगळे वळण लागले. तत्पूर्वी, भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी परीस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
भाजपाच्या अशा पद्धत्तीने केला निषेध
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले तर भाजपने पाच वर्षात महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलनाची हाक दिली. पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याचे वेळी कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्याचे राष्टवादीने ठरवले. त्यानुसार, दुपारी चार वाजता याठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू लागले. त्यांनी भाजपच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले. त्याच वेळी भाजप कार्यकर्तेदेखील कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षाविरोधात घोषणाबाजी करत होते. मात्र, यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगविले. फडणवीस यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. फडणवीस दिसताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या वाहनांवर चपला फेकल्या. महिलांनी बांगड्या भिरकाविल्या.





