वरणगाव नगरपरीषदेला स्वच्छता अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकावर आणणार
नूतन मुख्यधिकारी शामकुमार गोसावी यांचा विश्वास ; पदभार स्वीकारला
वरणगाव : वरणगाव नगरपरीषदेला स्वच्छता अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकावर आणणार असल्याचा विश्वास वरणगाव नगरपरीषदेचे नूतन मुख्याधिकारी शामकुमार गोसावी यांनी येथे व्यक्त केला. शुक्रवारी पदभार स्वीकारताना त्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गोसावी यांचा सत्कार केला.
यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्ष शेख अखलाक, शेख युसूफ नगरसेविका माला मेढे, शशी कोलते, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नितीन माळी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, गणेश चौधरी, साजीद कुरेशी, ईरफान पिंजारी, कामगार नेते मिलिंद मेढे, समाधान चौधरी यांच्यासह कर्मचारी उपस्तिथ होते.
नियमात बसूनच कामकाज करणार
मुख्यधिकारी शामकुमार गोसावी म्हणाले की, कोणतेही काम नियमात बसवून तत्काळ केले जाईल. स्वच्छ भारत अभियानात वरणगाव पालिकेचा जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याने सरकारने पालिकेला पाच कोटी रुपये अनुदान दिले आहेत. स्वच्छतेचा दर्जा अधिक टिकऊन देशात 25 व्या क्रमांकावर तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कठोर परीश्रम घेवू तसेच यासाठी कर्मचारी व सदस्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
संकट मोचकांच्या मार्गदर्शनाने वाटचाल -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या भाषणात वरणगाव शहर स्वच्छतेच्या अभियानात जिल्ह्यात एक नंबर आले असून यापुढे राज्याचे संकटमोचक व जलसपंदा मंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा राज्यात प्रथम क्रमांक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुकीचा काळ असल्याने कामे करण्यास अल्प अवधी असलातरी विकासात्मक कामांना प्राधान्य देण्यात येईल व त्यासाठी मुख्याधिकार्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचलन संजीव माळी यानी केले.