उत्तरप्रदेश ‘योगींचेच’ ; पंजाबमध्ये ‘आप’च्या झाडूने केली सफाई तर गोवासह मणिपूर, उत्तराखंड भाजपाचा ‘करीष्मा’
Election Update इलेक्शन अपडेट : जाणून घ्या एका क्लिकवर पाच राज्यातील निवडणूक निकाल अपडेट
नवी दिल्ली : उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर गुरुवार, 10 रोजी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपचे सर्वच राज्यांमध्ये चांगली कामगिरी केल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत तर काँग्रेसची कामगिरी निराशाजनक असल्याचे आकडे सांगतात. उत्तरप्रदेशात योगी सरकारने निर्विवाद बहुमत मिळवल्याचे निकालावरून स्पष्ट झाल्यानंतर भाजपाने जल्लोष सुरू केला आहे.
पंजाबमध्ये ‘आपच्या’ झाडूने काँग्रेसचे सुपडे केले साफ
आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुपडे साफ केला आहे. आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांनी काँग्रेसचा पराभव केला. ममता बॅनर्जींनीही काँग्रेसपासून फारकत घेतल्यानं पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस साफ झाली. ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचा एकहाती कारभार सुरू आहे. आता पंजाबही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हातातून निसटलं आहे.





उत्तर प्रदेश ‘योगी आदित्यनाथांचेच’
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. भाजपाने 403 पैकी 273 जागांवर आघाडी मिळवली. भाजपाच्या विजयाचं चित्र स्पष्ट होताच नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. यूपीच्या जनतेने रामराज्याची निवड केली असे मत खासदार रवी किशन यांनी व्यक्त केले. भाजपने 269 जागांवर मोठी आघाडी घेतली तर सपा 123 जागा, बसपा 05, काँग्रेस 03 आणि अन्य 3 वर आघाडीवर असल्याचं दिसलं. दुपारी 1 वाजेपर्यंत गांधी कुटुंबियांचा पारंपरीक मतदारसंघ मानल्या जाणार्या रायबरेली येथे काँग्रेस उमेदवाराला तिसर्या स्थानी समाधान मानावं लागलं. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर राहिले. दरम्यान, उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचे राजकारण करणार्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही.
गोवा भाजपाकडे : उत्पल पर्रीकरांचा पराभव
गोव्यातील पणजी विधानसभा मतदारसंघातून गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा पराभव भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी केला आहे. उत्पल पर्रीकर यांचा 800 मतांनी पराभव झाला आहे. उत्पल पर्रिकर हे भाजपचे बंडखोर उमेदवार होते तर गोव्यात भाजपाने विजय मिळवला आहे. दरम्यान, महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणार्या शिवसेनेचा अद्याप एकही उमेदवार निवडून आलेला नाही. शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर ‘फ्लॉप शो’ कायम असल्याची चर्चा आहे.
उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपच
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. यामध्ये 44 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता आहे.
मणिपूरमध्येही ‘भाजपची आघाडी’
2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे एक्झीट पोलमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, मणिपूरमध्ये भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचल सुरु आहे. मणिपूरमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे. इतर अमेदवार 14 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये देखील पुन्हा भाजपचं सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
जाणून घेवू या राज्यनिहाय पक्षांना मिळालेल्या जागा-
उत्तर प्रदेश
(एकूण जागा- 403 ; बहुमतासाठी आवश्यक जागा- 202)
भाजप- 269
समाजवादी पार्टी- 129
बहुजन समाज पार्टी- 01
काँग्रेस/अन्य- 04
पंजाब
(एकूण जागा- 117 ; बहुमतासाठी आवश्यक जागा- 59)
भाजप- 02
काँग्रेस- 18
अकाली दल- 04
आम आदमी पार्टी- 92
इतर- 01
गोवा
(एकूण जागा- 40 ; बहुमतासाठी आवश्यक जागा- 21)
भाजप- 20
काँग्रेस- 11
मगोप- 02
आप- 02
इतर- 05
उत्तराखंड
(एकूण जागा- 70 ; बहुमतासाठी आवश्यक जागा- 36)
भाजप – 48
काँग्रेस – 18
इतर- 04
मणिपूर
(एकूण जागा- 60 ; बहुमतासाठी आवश्यक जागा- 31)
भाजप- 29
काँग्रेस- 10
एनपीएफ- 10
इतर- 11
(अपडेट निकालासाठी लिक रीफ्रेश करा)
