भुसावळ पालिकेने जाहीर केली प्रभाग रचना : नगरसेवकांच्या दोन जागा वाढल्या !
Ward composition announced by Bhusawal Municipality भुसावळ : राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानच विरोधी पक्षासह महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा पवित्रा घेतला आहे मात्र दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रक्रिया पूर्ववत ठेवल्यानंतर गुरुवार, 10 रोजी जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका व नगरपरीषदेत प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. (Ward composition announced by Bhusawal Municipality) भुसावळ शहरात आतापर्यंत 24 प्रभागांच्या माध्यमातून 48 नगरसेवक निवडले जात होते मात्र आता नव्या प्रभाग रचनेनुसार 25 प्रभाग राहणार असून दोन नगरसेवक या माध्यमातून वाढल्याने एकूण 50 नगरसेवकांसाठी यापुढे निवडणूक होईल, हे स्पष्ट झाले आहे.
17 मार्चपर्यंत सूचना व हरकती सादर करता येणार
प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधीत प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे 17 मार्चपर्यंत हरकती सादर करता येणार आहेत. प्रारुप रचना, प्रभागदर्शक नकाशे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्ड, भुसावळ नगरपालिकेचे नोटीस बोर्ड, उपविभागीय कार्यालय भुसावळ, तहसील कार्यालय भुसावळ, तलाठी कार्यालय यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे संकेतस्थळ www.jalgaon.gov.in तसेच भुसावळ नगरपालिकेचे संकेतस्थळ https://bhusavalmahaaulb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.





ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांची शक्यता ?
राज्यात ओबीसी आरक्षण प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र विधेयकदेखील बहुमताने मंजूर करीत ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिका, जिल्हा परीषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे जाहीर केले होते, परंतु राज्य निवडणूक आयोगाने नियोजित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 15 नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया पूर्ववत ठेवत नगरपालिका प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुका या वेळेतच आणि ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, असे संकेत आहेत. यापूर्वी जिल्ह्यात गेल्याच जानेवारी महिन्यात बोदवड नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन टप्प्यात ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्याचे उदाहरण आहे.
