नऊ वर्षांपासून गुंगारा देणारा चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : चोरीच्या गुन्ह्यात संशयीताविरोधात रेल्वे न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले होते मात्र तब्बल नऊ वर्षांपासून भुसावळ लोहमार्ग पोलिसांना पोलिसांना गुंगारा देणार्या आरोपीच्या गोपनीय माहितीच्या आधारे मुसक्या आवळण्यात यश आले आहे. बाबूराव नामदेव मानकर (37, मंदिर पोलीस चौकीजवळ, मातंगवाडा, शेगाव, जि.बुलढाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून अटक
चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी बाबूराव मानकर याच्याविराधोत 2012 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता व रेल्वे न्यायालयाने आरोपीविरोधात पकड वॉरंट जारी केले मात्र आरोपी दिलेल्या पत्त्यावर गवसत नव्हता. आरोपी शेगावातील मुरारका शाळेजवळील लहुजी झोपडपट्टीजवळ राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल खोडके, पांडुरंग वसु, हवालदार अशोक लांडगे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. भुसावळ न्यायालयात आरोपीला हजर केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.



