बहिणाबाई कन्यादान योजनेतून वधूच्या माता-पित्यास धनादेश
खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम
यावल : खाजगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्था, जळगाव मार्फत जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षक यांच्या मुलींच्या लग्नामध्ये कवयित्री बहिणाबाई कन्यादान योजनेमार्फत मुलीच्या लग्नासाठी सहा हजार रुपयांचा धनादेश देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या खाजगी प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका वंदना दिलीप चौधरी यांच्या द्वितीय कन्या पौर्णिमा (पल्लवी) हिच्या विवाह प्रसंगी नाथमंदिर न्हावी, ता.यावल येथे हा धनादेश बुधवारी देण्यात आला.
उदात्त हेतूने योजना कार्यान्वीत
मुलींचा जन्मदर वाढविणे व स्त्री बद्दल आदर निर्माण करणे हा उदात्त हेतू लक्षात घेऊन सर्व संचालक मंडळाने ही योजना सुरू राबवण्यात सुरूवात केली आहे. लग्नाच्याच दिवशी हा धनादेश पतपेढीकडून मुलीच्या आई-वडिलांच्या हाती दिला जातो. खाजगी प्राथमिक सोसायटीमार्फत सहा हजार रुपयाचा धनादेश शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.एच.महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, संचालक प्रसन्ना बोरोले, मुख्याध्यापक डिगंबर तळेले, उपशिक्षक वैभव फिरके, घुले, चव्हाण, तडवी, मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.



