मुदतीत कर अदा न केल्याने यावल येथे दोन मोबाइल टॉवर सील
यावल : यावल महसुल विभागाकडून मार्च अखेरपर्यंत कर वसुलीसाठी मोहीम राबवली जात आहे. शहरातील दोन मोबाइल कंपन्यांकडे टॉवरचा कर थकल्याने गुरुवारी मंडळाधिकारी, तलाठी यांनी दोन्ही मोबाइल टॉवर सील केले आहेत.
थकबाकीदारांमध्ये खळबळ
महसुल विभागाकडून सध्या ‘मार्च एंडिंग’साठी थकीत कराची वसुली सुरू आहे. वारंवार कर वसुलीसाठी नोटीस बजावून देखील शहरातील टाटा इंडिकॉम व बीपीएल हच कंपन्यांनी दोन मोबाइल टॉवरचा कर अदा केलेला नाही. संधी देऊनही टाळाटाळ करणार्या या कंपन्यांवर कारवाईसाठी गुरुवारी तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये मंडळाधिकारी शेखर तडवी, मंडळाधिकारी मिलिंद देवरे, तलाठी ईश्वर कोळी व कोतवाल यांनी दोन्ही मोबाइल टॉवर सील केले. यात टाटा इंडिकॉम कंपनीकडे 74 हजार 154 रुपये तर बीपीएल हच कंपनीकडे 40 हजार 870 रुपये कर थकला आहे. जोपर्यंत कर अदा केला जात नाही तोपर्यंत मोबाइल टॉवर्सचे सील काढले जाणार नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे या दोन्ही मोबाइल कंपन्यांची सेवा खंडीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



