भुसावळात अपार्टमेंटला भीषण आग : मयत व्यापार्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
शॉर्ट सर्किटने आगीचा संशय : सुदैवाने कुटुंबातील तीन सदस्य बचावले तर अन्य अपार्टमेंटमध्ये आग पोहोचण्यापूर्वीच नियंत्रण
भुसावळ : भुसावळात अपार्टमेंटमधील तिसर्या मजल्यावर प्लॅटला लागलेल्या आगीत होरपळून 60 वर्षीय प्रौढ व्यापार्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. मयत व्यापार्याच्या मृतदेहावर शहरातील सिंधी समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आगीचे स्पष्ट कारण कळू शकले नसलेतरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत मयत व्यापारी केशवलाल मोरंदमल वाधवानी (60) यांचा मृत्यू ओढवला तर त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेला त्यांचा मुलगा लखन हा होरपळल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात आगीसह अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पहाटेच्या सुमारास लागली आग
नाहाटा महाविद्यालयाजवळील महेश नगरातील निकुंज अपार्टमेंटमध्ये व्यापारी केशवलाल मोरंदमल वाधवानी हे परीवारासह वास्तव्यास होते. शनिवारी मध्यरात्री अचानक प्लॅटला आग लागल्याने त्यात होरपळल्याने वाधवानी यांचा मृत्यू झाला तर घरात पसरलेल्या धुरानंतर लखन वाधवानी याला जाग आली व त्याने लहान भाऊ जतीन, आई माया वाधवानी यांना उठवत खाली आणले व वडिलांना वाचवण्यासाठी तो गेल्यानंतर होरपळल्याने भाजला गेला. आग भडकली असल्याने वडीलांना काढणे शक्य ठरल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. पहाटेच्या सुमारास अग्निशमन बंब आल्यावर आग आटोक्यात आली. माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह नागरीकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

लाखो रुपयांचे नुकसान
आगीमुळे घरातील संसारोपयोगी वस्तूही आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात प्रवीण रामचंद्र खिलवानी यांच्या खबरीनुसार अकस्मात आग व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, आगीमुळे घरातील फरश्या उखडल्यातर बाथरूममधील गॅस गिझर पूर्णपणे नष्ट झाले. सुदैवाने वेळीच गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनेची माहिती घेत आगीचे नेमके कारण काय याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.
जळगावातील खुनांना अनैतिक संबंधाची किनार ! : 24 तासात दोन तरुणांची हत्या




