ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सव्वा कोटीचे दागिण्यांवर डल्ला
पुणे : पुण्यातील वारजे माळवाडी परीसरात एका ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी चोरट्यांनी व्यवसायासाठी गाळा भाड्याने घेतला. सराफ दुकान बंद असल्याचे हेरून चोरट्यांनी दोन्ही दुकानांमधील सामायीक भिंतीला भगदाड पाडून त्यातून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करत सव्वा कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, दोन संशयित आरोपींना वारजे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
दुकान बंद असल्याची साधली संधी
याप्रकरणी दुकानाचे मालक आनंदकुमार चुन्नीलाल वर्मा (रा.कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. वारजे परीसरात माउली ज्वेलर्स हे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणेपाचच्या दरम्यान ज्वेलर्सचे मालक दुकान बंद करून बाहेर गेले होते. त्यावेळी दुकानाशेजारील मसाल्याच्या व्यवसायासाठी भाड्याने घेतलेल्या दुकानात फर्निचरचे काम सुरू होते. शेजारी नवीन दुकानाचे काम सुरू असल्याने चोरट्यांचा संशय न आल्याने दागिने मांडलेल्या अवस्थेतच ठेवून ज्वेलर्सचे मालक दुकान बंद करून बाहेर गेले होते. याचा गैरफायदा घेत दुकानातून सर्व दागिने पिशवीत भरून ते पसार झाले.



