वडिल करायचे दारू पिवून शिविगाळ : मुलाने काढला असा काटा
संख : वडील दररोज दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करून पत्नीसमोर अपमान करतात, म्हणून मुलानेच त्यांचा खून केला. शिवाप्पा चंद्राम पुजारी (वय 70) असे मृताचे नाव आह .सोनलगी (ता. जत) येथे ही घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपी मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी यास उमदी पोलिसांनी अटक केली आहे. मल्लीकार्जून याला जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पित्याच्या डोक्यात मारली काठी
सोनलगी येथे शिवाप्पा पुजारी हे सिध्दरामेश्वर मंदिराचे पुजारी होते. ते पत्नीसोबत राहत होते. त्यांना तीन मुले व मुलगी आहे. सर्व मुले विभक्त राहतात. आंबाण्णा, लक्ष्मण व मल्लिकार्जुन ही तिन्ही मुले शिवाप्पा यांच्याशेजारी राहतात, तर मुलगी पुण्याला सासरी असते. बुधवारी रात्री शिवाप्पा यांचे मल्लिकार्जुनच्या पत्नीबरोबर भांडण झाले होते. यानंतर शिवाप्पांनी पहाटेच्या वेळी मुलांच्या घराचा दरवाजा वाजविला. त्यावेळी मल्लिकार्जुन व त्यांच्यात वादावादी झाली. दररोजच्या भांडणाचा राग मनात धरून मल्लिकार्जुनने बापाच्या डोक्यात जोरात काठी मारली आणि जमिनीवर ढकलून दिले. शिवाप्पांचे डोके भिंतीवर आपटल्याने जबर दुखापत झाली. रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मुलाविरोधात खुनाचा गुन्हा
उमदी पोलिसांनी मयताची मुले मल्लिकार्जुन, लक्ष्मण, आंबाण्णा यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, मल्लिकार्जुनने खून केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत लक्ष्मण शिवाप्पा पुजारी (वय 45) याने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.


