आक्षेपार्ह पोस्टचा जाब विचारल्याने महिलेस मारहाण ; पाच जणांवर गुन्हा
जळगाव : धरणगाव शहरातील हेमंत दुतिया यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केल्याचा आरोप करीत शिवसेना पदाधिकार्यांनी दुतिया दांपत्याला मारहाण केली होती. दुतिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेनेच्या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी आता शिवसेनेच्या ज्योती शिवदे यांनी देखील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाणीत मंगळसूत्रासह पोत गहाळ
शिवदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुतिया यांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचा जाब विचारल्याने राग आला. या मुळे हेमंत दुतिया यांच्यासह गौरी दुतिया, आरेष प्रेमजी बाठे, पुंडलिक महादू सातपूते, भूषण नामदेव सोमवंशी (सर्व रा. धरणगाव) यांनी मारहाण केली. जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या धक्काबुक्कीत शिवदे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व पोत तुटून गहाळ झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मारहाणप्रकरणी पाच जणांवर जळगाव येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर तपास करीत आहेत.




