यावलच्या विवाहितेला मारहाण करीत विनयभंग : तिघांविरोधात गुन्हा
यावल : शहरातील विवाहितेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेसह पतीला माराहाण
यावल शहरातील एका भागातील 38 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्यास आहे. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 5 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील एका गावातील तुषार गोपाळ पाटील, गोपाळ शामराव पाटील आणि सविता गोपाल पाटील यांना उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याचा राग आला. त्यांनी महिलेला व तिच्या पतीसह बेदम मारहाण केली. यातील संशयीत आरोपी तुषार पाटील याने विवाहितेचा हात पकडून अश्लिल शिविगाळ केली, विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला व जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत महिलेने यावल न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली होती. बुधवार, 30 मार्च रोजी न्यायालयाच्या आदेशान्वये संशयीत आरोपी तुषार गोपाळ पाटील (30), गोपाळ शामराव पाटील (55) आणि सविता गोपाळ पाटील (36) यांच्याविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय देवरे करीत आहे.




