पोलिसांवर हल्ला करणार्या आरोपीची जळगावात निघाली ‘वरात’
पोलिस प्रशासनाने दिला कायद्यात रहाल तर फायद्याल रहाचा इशारा ः
जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्यासह जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांवर हल्ला करणार्या आरोपीची राहत्या घरापासून गेंदालाल मिल परीसरातून धिंड काढण्यात आली. जुबेर उर्फ डबल भिकन शेख (25, रा.गेंदालाल मिल, जळगाव असे आरोपीचे नाव आहे.
अशी आहे घटना
घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी जुबेर उर्फ डबल भिकन शेख याच्या घरी बुधवार, 30 मार्च रोजी मध्यरात्री शहर पोलिस कर्मचारी गेले. डबलच्या घरी पोलीस आल्यानंतर कुत्रे भुंकायला लागल्याने डबलला चाहूल लागली. संशयीत पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून शेजारी राहणार्या अफसरबेग नूरबेग उर्फ कालू यांच्या घरात घुसला. त्यावेळी पोलिसांना धमकी देवून माझ्याजवळ येवू नका नाही तर स्वत:ला मारून ठाकेन, अशी धमकी दिली. गच्चीवर जावून पोलिसांच्या अंगावर गॅस सिलेंडर फेकले, सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही आणि जुबेरने उडी मारताच पोलिसांनी त्याला पकडले. जुबेरला पकडताच त्याची आई मुमताजबी व भाऊ फारुख यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुमताजने पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे यांच्या पाठीला चावा घेत त्यांना जखमी केले. नंतर त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गेंदालाल मिल परीसरातून काढली आरोपीची धिंड
पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शुक्रवार, 1 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास आरोपी जुबेर उर्फ डबल यांची याची हातात बेड्या ठोकून राहत्या घरापासून गेंदालाल मिल परीसर आणि शिवाजी नगरातील मुख्य रस्त्यापर्यंत धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांच्या उरात धडकी भरली.


