कोल्हापूरात 25 हजारांत गर्भपात करणार्या बोगस डॉक्टरसह तिघे जाळ्यात
कोल्हापूर : वैद्यकीय परवाना नसतानाही 25 हजारांत बेकायदेशीररीत्या गर्भपात करणार्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास पर्दाफाश केला. कोल्हापुरात अंबाई टँक परिसरतील हरिओमनगर तसेच पडळ (ता. पन्हाळा) येथील रुग्णालयावर छापा टाकून दोन बोगस डॉक्टरसह एकूण तिघांना पोलिसांनी अटक केली. एक संशयित एजंट पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या संशयीतांना केली अटक
याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बोगस डॉक्टर उमेश लक्ष्मण पोवार (46, रा. रंकाळा तलाव परिसर, कोल्हापूर). डॉ. हर्षल रवींद्र नाईक (40, रा. कोल्हापूर), दत्तात्रय महादेव शिंदे (42, रा. पडळ, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे असून एजंट भरत पोवार पसार झाला आहे.


गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
शासकीय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल वेदक, पन्हाळा पंचायत समितचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कवठेकर, डॉ. सुनंदा गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले, महिला पोलिस रूपाली यादव यांच्या पथकाने या गर्भपात करणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. गर्भपात करणार्या या रॅकेटकडून शहरासह जिल्ह्यात किती काळपासून हा प्रकार सुरू आहे, आजपर्यंत किती जणांचे गर्भपात केले आहेत, याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.