सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी
मुंबई : सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी चिथावणी दिल्याचा आरोपावरून अटक करण्यात आलेले तसेच एसटी संपकर्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्याबाजुने लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सदावर्ते यांना एल.टी.मार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत 13 एप्रिलपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
सदावर्ते पत्रकाराच्या संपर्कात : नागपूर कनेक्शन
युक्तिवादात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठ-मोठे खुलासे केले आहेत. घरत यांनी 11 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. घरत यांनी कोर्टात सांगितले की, एका मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केले असून या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी 10.30 पासून व्हॉटसअॅप चॅटिंग आहेत. या दोघांत व्हॉटसअॅप कॉल झाले तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला, त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही. सदावर्ते यांनी युनियनकडून पैसेही गोळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. . 1 कोटी 55 लाखांहून अधिकची रक्कम गोळा केली आहे. काहीजण यामागे आहेत, जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करतायेत. गेल्या सहा महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. 530 रुपये प्रत्येक एसटी कर्मचा-यांकडून गोळा केले गेले. जवळपास दीड कोटी रुपये रक्कम जमा आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूरमधून व्हॉटसअप कॉल झाले होते. नागपूर कॉल नंतर ‘पत्रकार पाठवा’ चा मेसेज करण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल करण्यात आले. हा सुनियोजित कट होता. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे, असे वकीलांनी न्यायालयात सांगितले.

त्या पैशांचे अनेक लाभार्थी
जमा केलेल्या पैशांचे इतर ही काही लाभार्थी आहेत, हे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी 4 नवीन अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे. आरोपी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, सविता पवार या चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. आणखी मोबाईल फोन शोधायचा आहे आणि एक कोटी 80 लाख रुपये कोणी कसे गोळा केले, ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा आहे, असे सरकारी वकील म्हणाले.