प्रेयसीची भिंतीवर डोके आपटून हत्या करीत दागिने लांबवले : प्रियकराला बेड्या


पुणे : हडपसर पोलिसांनी प्रियसीची हत्या केल्याप्रकरणी किसन सीताराम जगताप (46, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, ज़ि पुणे) यास अटक केली आहे. या घटनेत सुनीता बाळु कदम (44, रा. वैदुवाडी, हडपसर) यांचा मृत्यू झाला.

भिंतीवर आपटले डोके
जगताप व कदम यांच्या प्रेमसंबंध होते मात्र प्रेमसंबंधातून झालेल्या वादात महिलेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने, मोबाईल आरोपीने लांबवले होते. याप्रकरणी सुनिता कदम हिच्या विवाहित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मयत सुनीता कदम या आपली मुलगी व जावई यांच्यासह वैदुवाडी येथे राहत होत्या. त्यांचे किसन जगताप याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन त्यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला.


आरोपीला अटक
किसन जगताप याने सुनीता कदम यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यात सुनीता यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्याने सुनीता कदम यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा 46 हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला. हा प्रकार फिर्यादी यांना रविवारी सकाळी पावणेनऊ वाजता लक्षात आला. त्यांनी हडपसर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी किसन जगताप याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे अधिक तपास करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !