वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील
वनविभागाच्या अधिकार्यांना बैठकीत सूचना : वन्यप्राण्यांच्या वाढत्या धुमाकूळानंतर आमदारांकडे शेतकर्यांनी केल्या होत्या तक्रारी
मुक्ताईनगर : वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या. मुक्ताईनगर तालुक्यात वाढत्या वन्य प्राण्यांच्या धुमाकूळानंतर शेतकर्यांनी आमदारांकडे तक्रारी केल्यानंतर सोमवारी वनविभागाच्या अधिकार्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.
वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावसह चिखली, तरोडा, रुईखेडा, कुंड, दुई , सुकळी, डोलारखेडा, चिचखेडा, टाकळी, वायला, निमखेडी बु.॥, ईच्छापूर, निमखेडी, चारठाणा आदी प्रमुख गावांसह इतर असंख्य गावे ही वढोदा व मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र हद्दीत येतात. या गावांचे शेतशिवार हे या अंतर्गत व या शेतात जाणारे शेत रस्ते हे जंगलालगत येतात मात्र वन्यप्राण्यांचा वाढत चाललेला मुक्त संचार या पूर्वीच्या अप्रिय घटना पाहता शेतकरी हवालदिल आहेत शिवाय आता भारनियमनाचे चटके बसू लागल्याने अधिकच मनस्ताप होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी आमदारांकडे तक्रार करताच सोमवारी बैठक घेण्यात आली.

उपाययोजना करण्याच्या सूचना
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी शासकीय विश्रागृहावर वन विभागाचे अधिकारी, वीज वितरणचे अधिकारी यांची बैठक घेवून यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या. वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना वनविभागाच्या अधिकार्यांना दिल्या. घोडसगाव येथील शेतकरी रामा कोळी यांच्या गायीचा बिबट्याने फडशा पाडल्याने वन अधिकार्यांना तातडीने स्थळ पंचनामा त्वरीत करण्याचेदेखील आदेश या बैठकीत देण्यात आले. रात्रीच्या भारनियमनाबाबत सूचना करण्यात आल्या तसेच वन विभागामार्फत भूजल संधारणासाठी तरतूद असलेल्या व रोहयो अंतर्गत काम होणार्या सीसीट ी(सलग समतल चर) च्या कामासाठी आराखडा तयार करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी डी.एफ.ओ.विवेक हौसिंग आर.एफ.ओ. आशुतोष बच्छाव, वनपाल पी.टी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई, अफसर खान, प्रफुल्ल पाटील, महेंद्र मोंढाळे, गोलु मुर्हे, प्रदीप कोल्हे, रामा कोळी, संजय पोटदुखे, सारंग पटेल, कृष्णा पटेल, अरुण जावरे, भागवत दांडगे, सतीष वाघ, अनिल पटेल, जितेंद्र दांडगे उपस्थित होते.