वरणगावात वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार

वारंवार वीज खंडीत होण्याचा प्रकार वाढला ; शिवसेनेने विचारला जाब


वरणगाव : शहरात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरात वारंवार वीज खंडीत होण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रकारामुळे शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी वीज वितरण कार्यालय गाठून महावितरणच्या अधिकार्‍याला वीज खंडीत का होते? याचा जाब विचारून वीज वितरणच्या अभियंत्यांना निवेदन दिले.

सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील सुरू आहेत. आगामी काळात श्रीरामनवमी, महात्मा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती असे सण उत्सव येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून वीज वितरण कंपनी कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता दिवसा-रात्री अपरात्री चार ते पाच तास वीज खंडीत करीत आहे. वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांसाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास त्या नंबरवर उडवा-उडवीचे उत्तर दिले जाते तर अनेकदा मोबाईल बंद असतो. या सर्व प्रकारामुळे वरणगावकर जनता त्रस्त झाली आहे. संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला तर त्यांनाही खंडीत झालेली वीज कधी येईल हे सांगता येत नाही? या सर्व वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी शनिवारी दुपारी वरणगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी वीज वितरणचे कार्यालय गाठून येत्या आठ दिवसात हा गलथान कारभार सुरळीत नाही झाल्यास शिवसेना स्टाईलने वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.


निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदनावर जिल्हाप्रमुख समाधान महाजन, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, सुरेश चौधरी, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख कालू शर्मा, माजी उपशहरप्रमुख सुनील भोई, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास वंजारी, सुनील देवघाटोळे, गोली भोई, गोविंदा चौधरी, वैभव लोखंडे, सुफियान शेख, उप शहर संघटक भूषण बाविस्कर, दीपक शेडके, पंकज चौधरी यांच्यासह शिवसैनिकांच्या स्वाक्षर्‍या आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !