माजी मंत्री खडसे स्पष्टच म्हणाले ; मुली व बाईच्या मागे फिरून कुणाचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतेच !
मुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कलगीतुरा संपण्याचे नाव घेत नाही. खडसेंना ठाण्यात उपचारासाठी हलवावे लागेल, असे महाजन यांनी म्हटल्यानंतर खडसेंनी गिरीश महाजन यांना बुधवारपेठेत न्यावे लागेल, अशी खोचक कोपरखळी लगावली होती. भारनियमना विरोधात भाजपने काढलेल्या मोर्चानंतर माजी मंत्री खडसे यांनी महाजनांना महागाईविरोधात व वाढत्या इंधन दरवाढीविरोधात मोर्चा काढण्याचे सुचवले होते व त्यानंतर महाजनांनी खडसेंवर टीकेची तोफ डागली होती. यानंतर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा टीकेचे बाण चालवले आहेत. महाजन यांनी केलेले आंदोलन, उपोषण हे निव्वळ नोटंकी असते, नोटंकी करायची त्यांची नेहमीची पद्धत असते, असे खडसे म्हणाले आहेत.
महाजन यांच्यावर केली पुन्हा टीका
दोन दिवसाआधी जळगाव येथे आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. महाजन यांनी महागाई विरोधात ही मोर्चा काढावा, असा टोला खडसे यांनी लगावला नंतर महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. या टीकेला गुरुवार, 14 रोजी खडसे यांनी उत्तर दिले आहे. गुरुवार, १४ रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरातील फार्म हाऊसवर पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले की, महाजन यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात मोर्चा, आंदोलन केले असते तर बरे वाटले असते. मागे त्यांनी कापसाला सात हजारांचा भाव देण्याचे सांगितले मात्र हा भावही ते देऊ शकले नाहीत, ते नेहमी माझी मुख्यमंत्री पदावरुन खिल्ली उडवत असतात, उत्तर महाराष्ट्रातून माझे नाव मुख्यमंत्री पदासाठी आले तर गैर काय होते, मुख्यमंत्री पदापर्यंत येण्यासाठी योग्यता, पात्रता लागते यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मान्यता पाहिजे. पोरी-बाळींच्या मागे फिरुन कुणी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत जात नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. खडसेंच्या या टोल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पदापर्यंत येण्यासाठी लायकी लागते, ‘त्यांची’ नावे कशात येतात? हे सर्वांना माहित आहेच, असेही खडसे प्रसंगी म्हणाले. गेल्या दोन दिवसाआधी मुक्ताईनगरात तीन पत्रकारांवर अज्ञातांनी हल्ला केला होता. याविषयी खडसेंनी पत्रकारांना संरक्षण मिळावे, असे सांगितले. मुक्ताईनगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चांगले काम करीत होते, त्यांच्याविरुद्ध हेतुपुरस्कर तक्रारी करुन विधी मंडळात आक्रोश करण्यात आला, असा मार्मिक टोलाही आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी यावेळी लगावला.
