यावल तालुक्यातील तरुणाचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू
जळगाव : लमांजन शिवारातील गिरणा नदी पात्रात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवाीर सायंकाळी घडली. तरूणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मोहन उर्फ रोहित अशोक पाटील (20, थोरगव्हाण, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
पोहण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना
रोहित पाटील हा तरुण आई, वडील भाऊ यांच्यासह वास्तव्याला असून तो चोपडा तालुक्यातील वड्रीय येथे आयटीआयचे शिक्षण घेत होता. आयटीआय सोबत असलेल्या मित्रांसोबत शुक्रवार, 15 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील लमांजण शिवारातील गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी आला होता. त्यावेळी मोहनने अंगावरील कपडे काढून गिरणा नदी पात्रात उडी घेतली. नदी पात्रात उडी घेताच त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्यांचा पाण्यातच मृत्यू झाला.

कुटुंबियांनी फोडला टाहो
दरम्यान ही बाब सोबत असलेल्या मित्रांना समजल्यानंतर त्यांला नदीपात्रातून बाहेर काढले व खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत मोहनच्या पश्चात आई रेखा, लहान भाऊ गौरव व वडील अशोक पाटील असा परीवार आहे.