हल्ल्यात आमची भूमिका नाही ; सदावर्ते यांनी सर्व काही केले ; संशयीत आरोपींच्या कबुलीने सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या
मुंबई : राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील दोघा आरोपींनी गुणरत्न सदावर्तेच कर्तेधर्ते असल्याची कबुली न्यायालयाला दिली आहे. मुंबईतील घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंकडे बोट दाखवले आहे. या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून, सर्व काही सदावर्तेंनी केले, अशी कबुली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिल्याने सदावर्ते यांच्या आणखीनच अडचणी वाढल्या आहेत.
न्यायाधीशांपुढे दिली कबुली
या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपल्याला न्यायाधीशांशी बोलायचे आहे, अशी विनंती केली होती. न्यायालयाला काही सांगायचे आहे, असे ते म्हणत होते. या प्रकरणात आमचा काही रोल नाही. आम्ही आरोपी नाही, सगळे सदावर्ते यांनी केल्याचे अभिषेक पाटील म्हणाला. तशाच प्रकारची कबुली चंद्रकांत सुर्यवंशी यांनेही दिली. तसेच शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.

पुणे पोलिस सदावर्तेंचा घेणारताबा
अॅड.गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 9 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आहे. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या संदर्भातील अहवाल शासनास पाठवला आहे.