भाजपा आमदारांच्या गाडीच्या धडकेने दोघा भावांचा मृत्यू


नवी दिल्ली : भाजपा आमदार योगेश वर्मा यांच्या कारच्या धडकेने दुचाकीस्वार भाऊ ठार झाले आहेत. या घटनेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदाराचं स्टिकर असलेल्या गाडीनं दुचाकीस्वार भावांना उडवल्यानंतर कार आणि चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा अपघात कोतवालीच्या रामापूरजवळ झाला.

कार चालक ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत लखीमपूर खेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरतपूर या गावचे रहिवासी आहेत. रामापूरहून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले. योगेश वर्मा यांची पत्नी नीलम वर्मा यांच्या नावावर कारची नोंदणी असल्याचं सांगण्यात येत आहे.


अपघातावेळी आमदार नव्हते वाहनात
अपघाताच्या वेळी आमदार गाडीत नव्हते असं सांगण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण सिंह यांनी सांगितलं की, ’लखीमपूर-बहराइच रस्त्यावर रामापूरजवळ दुचाकी आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आढळलेली स्कॉर्पिओ गाडी भाजप आमदार योगेश वर्मा यांची आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.’

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही झाला होता अपघात
या आधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही लखीमपूर खेरी येथे अपघात झाला होता. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या भेटीला शेतकर्‍यांचा एक गट विरोध करत होता तेव्हा एका एसयूव्हीने चार शेतकर्‍यांना चिरडलं होतं. कथित घटनेनुसार संतप्त आंदोलकांनी दोन भाजप कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरला बेदम मारहाण केली, तर एका स्थानिक पत्रकाराचाही हिंसाचारात मृत्यू झाला. आशिष मिश्रा हे आंदोलकांना चिरडणार्‍या वाहनात होते, असा दावा शेतकरी नेत्यांनी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !