कुंपणानेच खाल्ले शेत : धुळ्यात कैद्यांच्या खात्यातील अधिक रक्कम कारागृह लिपिकाने हडपली


धुळे : धुळे जिल्हा कारागृहातील बंदिवानांच्या खात्यातील रकमेपेक्षा अधिक रक्कम परस्पर गंडवणार्‍या कारागृहातील लिपिक गजानन वारुळे विरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा
कारागृहातील लिपिक विलास केशव पवार (39) यांच्या तक्रारीनुसार कारागृहात बंदिवांनाच्या नावाने मनिऑर्डरच्या स्वरूपात पैसे येतात. रजिस्टर नं. 1 मध्ये त्याची नोंदणी केली जाते. या रजिस्टरची नियमित तपासणी करण्याचे काम न्याय विभागाचे लिपिक गजानन हिरामण वारुळे यांच्यावर सोपवले आहे. बंदिवानांच्या जमा-खर्चाचा हिशेब मात्र विलास पवार यांच्याकडे असतो. बंदिवान मुक्त झाल्यावर त्यांच्या नावावरील शिल्लक रकमेचा हिशेब करून गजानन वारुळे हे उर्वरित रक्कम विलास पवार यांच्याकडून घेतात. त्यानंतर ती मुक्त होणार्‍या बंदिवानाला दिली जाते, तसा नियम आहे. काही दिवसांपूर्वी विलास पवार हे कामात व्यग्र असताना गजानन वारुळे आले. बंदिवान 314 मुक्त होत आहे. त्यांच्या नावे 6 हजार 540 रुपये आहे, असे सांगून त्यांनी बंदिवानाला देण्यासाठी पैशांची मागणी केली. लिपिक पवार यांनी सहा हजार 540 रुपये वारुळे यांना दिले. त्यानंतर दुपारी त्यांनी तुरुंग रक्षकांकडे चौकशी केल्यावर एकाही बंदिवानाची मुक्तता झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर गजाजन वारुळे यांनी रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. तसेच 17 नोव्हेंबर 2021 ते 18 जानेवारी 2022 या काळात वारुळे यांनी 29 हजार 842 रुपयांचा अपहार केला, असे स्पष्ट झाले. याप्रकरणी विलास पवार यांच्या तक्रारीवरून सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !