खंडेराव महाराजांच्या जयघोषात कुर्‍हेपानाचेत ओढल्या बारागाड्या


कुर्‍हेपानाचे : गावात मंगळवार, 21 रोजी खंडेराव यात्रोत्सव पार पडला. यात्रोत्सवानिमित्त परंपरेप्रमाणे बारागाड्या ओढण्यात आल्या. कुर्‍हेसह परीसरातील भाविकांची मोठ्या संख्येने प्रसंगी उपस्थिती होती.

यात्रोत्सवानिमित्त ओढल्या बारागाड्या
यात्रेच्या दिवशी खंडेराव महाराजांच्या मंदिरासह गावातील विविध मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. ग्रामस्थांनी दिवसभर यात्रेत खरेदीचा आनंद घेतला. सायंकाळी परंपरेनुसार कलंकामाता मंदिरापासून बारी वाड्यापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. कोरोना काळात दोन वर्षापासून यात्रोत्सव बंद होता त्यामुळे या वर्षी यात्रोत्सवासाठी स्थानिक गावातील विविध शहरात राहणारे ग्रामस्थ गावी परतले.


पोलिसांचा चोख बंदोबस्त
भगत संतोष रमेश पारधी यांनी बारागाड्या ओढण्याची जबाबदारी सांभाळली. बारागाड्या पाहण्यासाठी पुरुषांप्रमाणे महिलांची मोठ्या प्रमाणावर होती. दोन वर्षानंतर यात्रेत पाळणे, विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटण्यात आली. यात्रेत होणारी गर्दी पाहता कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच बारागाड्या ओढणे निर्विघ्न पार पडावे यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त केला. यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, समस्त ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, समस्त गावकर्‍यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !