भुसावळातील कबड्डी स्पर्धेत महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळाच्या संघाने मारली बाजी

सतेज क्रीडा मंडळातर्फे शहरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे प्रथमच आयोजन


भुसावळ : शहरातील क्रीडा मंडळातर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ज्ञानेश्वर चषक 2022 चे शहरात आयोजन करण्यात आले. उद्घाटन रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून 22 संघांनी सहभागी नोंदवला तर मध्यप्रदेशातील संघही सहभागी झाले. साखळी पद्धतीने सामने घेण्यात आले तर स्पर्धा मॅटवर खेळविण्यात आली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यानंतर स्पर्धेत जळगावच्या महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीयस्थानी जळगावचे कैलास क्रीडा मंडळ व तृतीयस्थानी भुसावळातील जय मातृभूमी संघ राहिला.

विजयी संघाचा पारीतोषिक व चषक देवून गौरव
विजयी संघाला रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्याहस्ते ज्ञानेश्वर चषक व 21 हजारांचे पारीतोषिक वितरीत करण्यात आले तर द्वितीय पारीतोषिक 15 हजार रोख व स्मृतीचिन्ह देऊन युवा कार्यकर्ते रोहन सूर्यवंशी यांच्याहस्ते कैलास क्रीडा मंडळ, जळगाव यांना देण्यात आले तसेच माजी स्वीकृत नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नवे यांच्याहस्ते तृतीय क्रमांकांचे पारीतोषिक जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या संघाला प्रदान करण्यात आले.


युवा खेळाडूंनी नेहमीच प्रोत्साहन देणार : राजूभाऊ सूर्यवंशी
भुसावळ शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुणवंत खेळाडू आहेत मात्र त्यांना योग्य संधी मिळत नसल्याने ते मागे राहतात मात्र अशा खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपले निश्चित सहकार्य असेल व अशा स्पर्धांच्या माध्यमांतून खेळाडूंना चालना मिळून शहराचा नावलौकीकही निश्चितच वाढेल, असा आशावाद रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. प्रसंगी प्रा.सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे, अनिकेत पाटील, रणजीतसिंग राजपूत, रोहित सूर्यवंशी उपस्थित होते. आरएसग्रुप महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले. भुसावळ शहरांत सतेज क्रीडा मंडळामार्फत प्रथमच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !